नदीकिनारी असलेल्या वाड्यांना सतर्कतेचा इशारा
*💫कुडाळ दि.२३-:* गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडवला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे पणदूर गावाला लागून असलेल्या हातेरी नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या सिद्धार्थनगर, साईलवाडी, सावंतवाडा आदी वाड्याना पुराच्या पाण्यापासून धोका निर्माण झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिद्धार्थनगर वस्तीतील ३० ते ३५ कुटुंबांना पुराच्या पाणाचा वेढा बसण्याची शक्यता आहे. साईलवाडी येथील ग्रामदैवत सातेरी मंदिर सभोवती पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सातेरी मंदिर शेजारी असलेल्या साक्षी साईल यांच्या दुकानात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. उर्वरित नुकसानीचा आढावा घेण्याचे काम चालू आहे. त्याप्रमाणे पणदूर गावात जाणारा मुख्य मार्ग देखील बंद झाल्याने पणदूर सिध्दवाडी, सावंतवाडा, साईलवाडी, सिद्धार्थनगर, जितवणे आदी वाड्यांचा संपर्क तुटलेला आहे. पाण्याची पातळी कमी न झाल्यास ३० ते ३५ कुटुंबांना स्थलांतर करण्याची तयारी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली आहे. सरपंच दादा साईल, उपसरपंच बबन पणदूरकर, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत साईल, माजी उपसरपंच आबा सावंत आणि ग्रामस्थांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहे.
