२२ दिवसात९४८ कोरोना बाधीत रुग्णांचे समुपदेशन
*💫कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड बाधित रुग्णांचे दूरध्वनी द्वारे मानसिक समुपदेशन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ, उपकेंद्र रत्नागिरी अंतर्गत सुरु असलेल्या समाजकार्य विभाग (एम.एस.डब्ल्यू.) विभागाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली,कुडाळ या ३ तालुक्यात मुंबई विद्यापीठ, समाजकार्य (एम.एस.डब्ल्यू.) विभागाने २४ जून २०२१ रोजी पासून दूरध्वनी द्वारे मानसिक समुपदेशन पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये समाजकार्य विभागातील माजी २० विद्यार्थी तज्ञ समुपदेशक म्हणून सहभागी झालेले आहेत. या सेवेमध्ये रुग्णाची सद्यस्थिती अजमावून संस्थात्मक व गृहविलगीकरणातील आवश्यक खबरदारी व काळजी घेणेबाबत मार्गदर्शन, मानसिक धीर देणे,डॉक्टर मार्गदर्शनाचे महत्व पटवून देणे, आवश्यकते प्रमाणे पाठपुरावा करणे व इतर अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करणे या बाबी समाविष्ट आहेत. यासाठी आवश्यक असलेली संपर्क यादी सावंतवाडी,कणकवली,कुडाळ यांचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मार्फत उपलब्ध करून दिली जात आहे तसेच आवश्यक तेथे शासन स्तरावरून समन्वय व सहकार्य होत आहे. या सुरू केलेल्या उपक्रमाला २२ दिवस पूर्ण झाले आहेत.यामध्ये सावंतवाडी,कणकवली, कुडाळ या ३ तालुक्यातील एकूण ९४८ कोरोना बाधीत रुग्णांचे समुपदेशन केलेले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम जाणवत असून मानसिक धीर, व उपचाराचे योग्य मार्गदर्शन या मुळे हा आजार गंभीर होण्यापूर्वी नियंत्रित करण्यास मोठी मदत होत आहे. या कार्यक्रमाचे सनियंत्रण समाजकार्य विभागाच्यावतीने प्रा.अमर निर्मळे व प्रा.माया रहाटे हे करत असून समन्वयक म्हणून अमोल भोगले,चैत्राली राऊळ,प्रा.पूनम गायकवाड करत आहेत. तसेच १८ तज्ञ समुपदेशक यामध्ये गौरी दळवी, अक्षय मोडक,सौरभ शिंदे, कुणाल चव्हाण, भुषण मळेकर, सुरज पिल्लई, अभिषेक राऊळ, समीक्षा हातखंबकर, श्वेता देसाई, विश्वजित जाधव,विल्सन फर्नांडीस, रिया सांगेलकर,कमलेश भंडारी व इतर समुपदेशनाची विशेष जबाबदारी पार पाडत आहेत. या कार्यक्रमासाठी माझा वेगुर्लाचे श्री.मोहन होडावडेकर व उपकेंद्र रत्नागिरीचे समन्वयक डॉ.किशोर सुखटणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
