जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केली पाहणी
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसाने मेस्त्री कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नेरुरचे जिल्हा परिषद सदस्य रुपेश तेली यांनी याची पाहणी करून संबंधित यंत्रणेला तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या.
चेंदवण परिसरात रविवारी झालेल्या वादळी पावसाने टेंबवाडी येथील विजय मेस्त्री, श्रीमती गिरीजा मेस्त्री, गणपत मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये विजय मेस्त्री यांचे देवघर पूर्णपणे जामीनदोस्त झाले तर गिरीजा मेस्त्री व गणपत मेस्त्री यांचे राहत्या घराचे छप्पर पूर्णपणे तुटून भिंतीना तडे गेले आहेत.
दरम्यान याची माहिती मिळताच नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्षपणे पाहणी करून संबंधित तलाठी व आपत्कालीन अधिकारी यांना पंचनामा करून तातडीने मदत करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा नुकसानीची माहिती देणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे मोठे नुकसान झाले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी बाळू कोचरेकर, मंगेश बांदेकर, चेंदवण ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
