भरत गावडे:तळवडे येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी..
⚡सावंतवाडी ता.०६-: आदर्शवत जीवन जगण्यासाठी आपल्यासमोर उत्तुंग व्यक्तिमत्वांचे आदर्श असायला हवेत. थोरा मोठ्यांची जीवनचरित्रांच्या अभ्यासातूनच आपल्याला असे आदर्श सापडतात. सावंतवाडी संस्थानांचे राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हेही एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले थोर लोक कल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य तथा दाणोली येथील साटम महाराज वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे यांनी केले.
तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच दाणोली येथील साटम महाराज वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी संस्थानाचे अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८९ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये गावडे हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख म. ल. देसाई, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षक प्रसाद आडेलकर, किशोर नांदिवडेकर, मीलन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाले.
गावडे पुढे म्हणाले की, बापूसाहेब महाराज यांनी अतिदुर्गम आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया रचला. संस्थानातील प्रजेचा प्रमुख व्यवसाय शेती. शेतीला नियमित पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी तलाव, बंधारे बांधले. प्रजेच्या आरोग्याच्या काळजीपोटी रुग्णालये उभारली. बापूसाहेब महाराजांच्या पराक्रमाने, दूरदृष्टीने आणि कुशल प्रशासनाने सावंतवाडी संस्थानाला देशात एक वेगळीच ओळख मिळवून दिली. महात्मा गांधीजींनी बापूसाहेब महाराजांचा रामराजा व त्यांच्या संस्थानाचा उल्लेख रामराज्य असा केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना न्यायप्रिय राजा म्हणून गौरवले होते. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आहोत तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी नागरिकांना लष्करी शिक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी स्वतः प्रथम लष्करी शिक्षण घेतले. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्याला स्थानिक भाषेचे ज्ञान हवे म्हणून त्यांनी मालवणी, मराठी भाषा शिकून घेतल्या. शिक्षणाचे महत्त्व जाणून रयतेसाठी प्रौढ शिक्षण वर्ग आणि महिलांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. त्या शाळेत महाराज स्वतः शिकवत असत. वाचन संस्कृती रुजावी म्हणून श्रीराम वाचन मंदिराची स्थापना केली. अशा या प्रजाहितदक्ष राजाच्या चरित्राचे सर्वांनीच पारायण केले पाहिजे असे गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सूत्रसंचालन किशोर नांदिवडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद आडेलकर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
