Headlines

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदग्रहण सोहळ्यात डॉ. संतोष राणे यांनी स्वीकारला पदभार…

सिंधुदुर्गातून सात जणांना गव्हर्निंग कौन्सिल मेंबरचा पदभार..

⚡कुडाळ ता.०६-: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर ही संस्था शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कुलाबा, मुंबई येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रेसिडेंट कप स्वीकारून रवींद्र माणगावे यांनी चेंबरच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून करुणाकर शेट्टी यांना पदभार देण्यात आला तर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सिंधुदुर्गचे डॉ. संतोष शिवाजी राणे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कोंकण विभाग उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
त्याचप्रमाणे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजन नाईक, ऍड नकुल पार्सेकर, मनोज वालावलकर, विजय केनवडेकर, कुणाल वरसकर, मिलिंद प्रभू व विशाल कामत यांना पदभार देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे विशेष कौतुक करत प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करण्याची संकल्पना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात उद्योजकता वाढवून रोजगारनिर्मितीला चालना देत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या ए आय (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः MSME क्षेत्राने AI तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सौरऊर्जा मॉड्यूलचा उल्लेख करत, हे मॉड्यूल उद्योग, शेती आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. हे मॉड्यूल लवकरात लवकर महाराष्ट्र चेंबरसमोर सादर करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. उद्योग, व्यापार, कृषी, नवउद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र चेंबर अधिक प्रभावी योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकण विभागातून डॉ. संतोष राणे यांची उपाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारली. डॉ. संतोष शिवाजी राणे हे महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या राज्यव्यापी महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजन, वित्तीय संरचना आणि अंमलबजावणीत प्रमुख भूमिका बजावत असून, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करण्याच्या या अभियानाच्या प्रभावी विस्तारासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत.
यानंतर महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही ‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. उद्योजकांना अधिक प्रभावी सेवा, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरसोबत सामंजस्य करार (MOU) करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली. तसेच, एमएसएमईसाठी स्वतंत्र आयुक्तालयाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र चेंबरने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे उद्योगमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले. राज्यातील उद्योजकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उद्योजकांचा जनता दरबार’ उपक्रमात महाराष्ट्र चेंबरने सक्रिय नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र चेंबरच्या आगामी शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही देत, “उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे,” असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
या पदग्रहण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक मान्यवर, यशस्वी उद्योजक उपस्थित होते. त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून कोंकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि उद्योजकतेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबरच्या या नव्या नेतृत्वाखाली उद्योग, व्यापार, कृषी आणि ग्रामीण उद्योजकतेला अधिक बळ मिळून कोंकणासह संपूर्ण महाराष्ट्रात विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ तसेच कुडाळ एमआयडीसी असोसिएशनने अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page