चिमणी पाखरे आणि नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूलचा संयुक्त वनमहोत्सव..
⚡कुडाळ ता.०६-: पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व बालवयापासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याच्या उद्देशाने चिमणी पाखरे प्री-स्कूल व नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिव्हाळा सेवाश्रम येथे वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात दोन्ही शाळांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या हातांनी सेवाश्रम परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण केले. हिरव्या रंगाचे पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “पर्यावरण वाचवा” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
वृक्षारोपणासोबतच विद्यार्थ्यांसाठी पानांवरील चित्रकला, बियांचे संवर्धन, पर्यावरणावर आधारित लघुनाटिका, गाणी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना झाडांचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन व संरक्षण करण्याची सामूहिक शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. साक्षी बिर्जे, शिक्षिका रोशनी हळदणकर, परवीन शेख, निशा काणेकर, प्रियंका कवठकर, सिमीन नाईक, निशाद मनियार, अंतरा जोशी, गौरी भगत, पालकवर्ग तसेच टी.ई.ओ. जिव्हाळा सेवाश्रमचे संजय सु. बिर्जे उपस्थित होते. या अभिनव उपक्रमातून बालकांच्या मनात निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
