Headlines

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे आयोजन

जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्यने सहभागी होण्याचे आवाहन

कुडाळ : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन शनिवार दिनांक ८ आणि रविवार दिनांक ९ ऑगस्ट,२०२६ रोजी शिवराज पॅलेस, मुंबई पुणे हायवे, वडगाव मावळ पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी दिली असल्याची माहिती ग्राहक पंचायतचे सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी दिली.
वडगाव मावळ पुणे येथे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व पुणे महानगर आणि पुणे जिल्हा शाखा पदाधिकारी यांची सभा संपन्न झाली. यावेळी डॉ.विजय लाड यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन वडगाव मावळ, पुणे येथे आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले. या राज्य अधिवेशनात विभागनिहाय कार्यकर्त्यांना पंचप्राण पुरस्कार व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, ग्राहक संबंधित पुस्तकांचे प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, गटचर्चा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी ज्या भूमीवर ग्राहक चळवळीचे बिजारोपण केले, त्या पुण्यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य अधिवेशनासाठी राज्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, संघटक श्री. सर्जेराव जाधव व सचिव श्री.अरूण वाघमारे यांनी केले आहे.
या राज्य अधिवेशनाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातील अधिकाधिक प्रतिनिधींनी या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, संघटक विष्णूप्रसाद दळवी व सचिव संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page