Headlines

वालावलच्या धोकादायक शाळा इमारतीची जि.प. अध्यक्षांकडून पाहणी; विद्यार्थ्यांना अंगणवाडीत हलविण्याचे निर्देश…

⚡ओरोस, ता.०६-: वालावल येथील हुमरमळा-करमळीवाडी प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक असल्याची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांनी तातडीने शाळेला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात लगतच्या अंगणवाडी इमारतीत स्थलांतरित करून शैक्षणिक कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
पाहणीदरम्यान गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षकांकडून शाळेच्या इमारतीच्या स्थितीची माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले.
याचबरोबर शाळेच्या इमारतीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ऑडिट अहवाल प्राप्त होताच त्यानुसार आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या.
यावेळी अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करली जाणार नाही. तांत्रिक अहवाल प्राप्त होताच आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्यात येईल.”
जिल्हा परिषद प्रशासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत संवेदनशील असून, पालकांनी कोणतीही चिंता न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page