झालेली कामे, आलेल्या विकास निधीची माहिती जनतेला देणार:हरी खोबरेकर
*💫मालवण दि.१२-:* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मालवण तालुक्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान १२ ते २४ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून शिवसेना, महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेली कामे, आलेला विकास निधी याची देणार माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेविका आकांक्षा शीरपुटे, सुनीता जाधव, बाबी जोगी, पूनम चव्हाण, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, बाळू नाटेकर, यासह अन्य उपस्थित होते. शिवसंपर्क अभियानात गावागावात शिवसेनेचे नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहेत. सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही संकल्पना तालुक्यात राबविण्यात येणार आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण असून त्याप्रमाणे करणार काम करणार आहोत, असेही हरी खोबरेकर म्हणाले. तौक्ते चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच कोकणासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला आहे. वादळांसारख्या संकट काळासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी भरघोस निधी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येथील धुप्रतिबंधक बांधाऱ्यासाठी, भूमिगत विजवाहिन्या, यासह अन्य कामांसाठी ३ हजार ६३५ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध केला आहे. पुढील काळातील वादळाबाबत नियोजन करण्यात आले असून खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीतून उपाययोजनांसाठी हा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेला मंजुरी मिळाली असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही रक्कम नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा होणार आहे, असेही हरी खोबरेकर यांनी सांगितले.
