मालवण दि प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लिलांजली हॉल येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डिजिटल बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन व्यवहारांमधील संभाव्य सायबर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सारस्वत बँक, मालवण शाखेतर्फे विशेष सायबर सुरक्षा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी बँकेच्या विविध योजना आणि सेवांची माहितीही उपस्थितांना दिली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार आणि सुरक्षित बँकिंगविषयी मार्गदर्शन मिळणार असल्याने हा कार्यक्रम ज्येष्ठांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमाला संघाच्या सर्व सभासद बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ लेखक, मुक्त पत्रकार व संस्थेचे सभासद दिलीप रेडकर यांनी संयोजकांतर्फे केले आहे.
