विशाल परब: निरवडे कोनापाल येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त १२ भजन मंडळांचा सहभाग..

⚡सावंतवाडी ता.२१-: गावातील धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी निरवडे (कोनापाल) येथील ग्रामस्थ घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आपल्या धार्मिक परंपरा जपणाऱ्या येथील बांधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी काढले.
निरवडे येथील श्री देवी भराडी, रवळनाथ देवस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भव्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला विशाल परब यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच भजनकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत एकूण १२ नामवंत भजन मंडळांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या सादरीकरणातून भक्तिरसाची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळत आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी ७ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार १ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार १ रुपये आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकांसह उत्कृष्ट गायक, हार्मोनियमवादक, पखवाजवादक, तबलावादक, झांजवादक आणि नृत्य यांसाठीही विशेष बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे.
या धार्मिक सोहळ्यासाठी विविध दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत पारितोषिके पुरस्कृत केली आहेत. तसेच कै. लिलावती सहदेव धारगळकर यांच्या स्मरणार्थ विशेष पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक जिव्हाळ्याची जोड मिळाली आहे.
दरम्यान, देवस्थानच्या वतीने आयोजित या भजन स्पर्धेमुळे स्थानिक भजन मंडळांसह कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. धार्मिक परंपरेचे जतन आणि भजनकलेचे संवर्धन करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विशाल परब यांनी आयोजकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
