मालवण : (प्रतिनिधी)

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव आणि दीपोत्सव मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे श्री देव रामेश्वर मंदिरातून रात्री ९.३० वाजता पालखी मिरवणुकीने श्री देव नारायण मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात हा पालखी सोहळा होणार आहे. यानिमित्त पोथीपूजन व पुराणवाचनाचा धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या दीपोत्सवाला ऐतिहासिक परंपरेची जोड लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरून राजदंडाचे होणार वाजतगाजत आगमन असून, या आगमनामुळे सोहळ्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी-भवई, श्री देव रामेश्वर आणि श्री देवी सातेरी या मंदिरांमध्ये आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मिरवणूक, दशावतारी नाट्यप्रयोग आणि पहाटे उत्सवाची सांगता असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
