भेट घेत चर्चा केल्याची उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची माहिती
*💫दोडामार्ग दि.१०-:* दोडामार्ग आडाळी येथील एमआयडीसी प्रकल्पाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याने या प्रकल्पाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी . राणे यांची भेट घेत याबाबत विस्तृत चर्चा केली. नेस्टलेच्या धरतीवर या ठिकाणी तसेच अन्य उद्योग आल्यास हजारो तरुणांना रोजगार निर्माण होऊ शकतो, अशी मागणी यावेळी म्हापसेकर यांनी केली. यावेळी ना. राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत राज्य शासनाशी चर्चा करण्यात येईल. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्योग आणले जातील, अशी ग्वाही राणे यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिली. या चर्चेवेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत, महिला बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर, माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, बंड्या गांगण, अभी मुसळे, शेखर गांवकर आदी उपस्थित होते. दरम्यान, दोडामार्ग एमआयडीसी संदर्भात ना. राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या ठिकाणी नवीन उद्योग आल्यास हजारो बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. राज्याचे तत्कालीन उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी काही विकास प्रकल्पांची घोषणा केली होती. त्यामध्ये नियोजित चिपी विमानतळ, सी वर्ल्ड, कासार्डे एमआयडीसी, रेडी बंदर व दोडामार्ग आडाळी येथे एमआयडीसी या प्रकल्पांसाठी ते सातत्याने आग्रही राहिले होते. आडाळी एमआयडीसी वगळता अन्य प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध झाला. मात्र, स्थानिकांचा विरोध नसल्याने आडाळी एमआयडीसीला अवघ्या सहा महिन्यांत मंजुरी मिळाली होती. तसेच जमीन खरेदीची प्रक्रियाही वेगाने सुरू झाली होती. ना.राणेंसोबत चर्चा झाल्यानंतर अवघ्या सातव्या दिवशी जानेवारी २०१२ च्या पहिल्या आठवड्यात एमआयडीसीचे तत्कालीन सीईओ भूषण गगराणींच्या नेतृत्वाखालील पथकाने जमिनीची पाहणी केली. वीज, पाणी, वाहतूक आदींचा सर्व्हे केल्यानंतर आडाळी येथील जागा प्रकल्पासाठी योग्य असल्याचे निश्चित केले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. एवढ्या कमी वेळेत एखादी औद्योगिक वसाहत मंजूर होण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प ठरला होता. आडाळी एमआयडीसीसाठी २८८ हेक्टर जमीन अधिसूचित करण्यात आली. यातील २६५ हेक्टर जमीन एमआयडीसीकडे वर्ग झाली. यातील १०० एकरवर केंद्राच्या आयुष मंत्रालयाचा आयुर्वेदावर आधारित प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने मध्यंतरी हालचाली सुरू होत्या. याला काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला; मात्र या प्रकल्पाबाबतचा प्रस्ताव अद्याप कोणत्याच स्तरावर पुढे सरकलेला नव्हता. मात्र, आता या एमआयडीसी प्रकल्पाचे जनक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय उद्योग मंत्री पदाची धुरा आल्यामुळे हा प्रकल्प नक्कीच मार्गी लागेल असा विश्वास यावेळी राजेंद्र म्हापसेकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही एमआयडिसी मार्गी लागल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराची दालने खुली होणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
