मालवणचे प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर यांचे प्रतिपादन
*💫मालवण दि.१०-:* समुद्रात फक्त कॅच फिशिंग होते. त्यामुळे समुद्रातील मत्स्य उत्पादन कमी कमी होत आहे. अशावेळी मत्स्य संवर्धन शेतीकडे वळणे गरजेचे आहे. आज नोकरीच्या संधी कमी आहेत. त्यामुळे रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे ज्ञान अवगत करून रोजगाराच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन मालवणचे प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी येथ बोलताना केले. मालवण तालुक्यातील देवली येथील सत्यवान चव्हाण यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्गातील पहिल्या आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचा शुभारंभ झाला. त्यावेळी प्रभारी सहायक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर हे बोल्ट होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालवण येथील युएनडीपीचे अधिकारी रोहीत सावंत हे उपस्थित होते. या छोटेखानी समारंभास संघटनेचे संस्थापक रविकिरण तोरसकर, महेश नाईक, राजेश पोपकर, संदेश परब, नितीन नाईक, विनोद राऊळ, संतोष सामंत, विक्रांत नाईक, सत्यवान चव्हाण, रघुनाथ चव्हाण, शंकर चव्हाण, प्रतीक देऊलकर, गंगाराम चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी रविकिरण तोरसकर यांनी प्रास्ताविक केले. तर राजेश पोपकर यांनी स्वागत केले. यावेळी गंगाराम चव्हाण यांच्या हस्ते ग्रामदेवतेला श्रीफळ ठेवून संघटनेच्या वाढीसाठी साकडे घालण्यात आले. यावेळी बोलताना रवींद्र मालवणकर म्हणाले, आज नोकरीच्या संधी कमी आहेत. त्यामुळे रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचे ज्ञान अवगत करून रोजगाराच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. खेकडा पालन, कोलंबीची शेती, कालवे पालन, शोभिवंत मासे पालन, आदी मत्स्य शेतीचा उपयोग करून तरुण तरुणींनी आपली प्रगती साधली पाहिजे. त्यासाठी सरकारी योजनांचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ही रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त योजना असून त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा त्यासाठी आवश्यक असणारे सहकार्य आपण करू, असे सांगून श्री. मालवणकर यांनी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी रोहित सावंत, राजेश पोपकर यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी मत्स्य शेती आणि मत्स्य विषयक योजना याबाबत उपस्थितांनी सखोल चर्चा केली. शेवटी विक्रांत नाईक यांनी आभार मानले.
