पाच जण ताब्यात:१५ हजार ४०० रुपयांची रोकड व पत्ते जप्त..
कणकवली : शहरातील एका हॉटेल-लॉजच्या पाठीमागे आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत शहरातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांची चाहूल लागताच काहीजण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका हॉटेल-लॉजच्या मागील बाजूस काही व्यक्तींकडून जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना पाच जण पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण तेथून पसार झाले. या कारवाईत पोलिसांना १५ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते आढळून आले. पोलिसांनी ही रोकड व साहित्य ताब्यात घेतले असून, संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शहरात सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. हॉटेल – लॉजच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर झालेल्या या कारवाईमुळे अवैध जुगार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
