Headlines

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ‘ड्युएल डिग्री’ची सुविधा…

सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता असून मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी ही इतर विद्यापीठाशी समकक्ष आहे. एक पदवी शिक्षणक्रम पूर्ण करताना अन्य शिक्षणक्रमांच्या माध्यमांतून आणखी एक पदवी अर्थात ड्युएल डीग्री मिळवीण्याची सुविधा या विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्याची माहिती कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. संजय थोरात यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रा. थोरात म्हणाले, युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदवी, पदव्युत्तर शिक्षणक्रमासह संशोधन पदवी (Ph.D.) घेण्याची संधी देखील पुन्हा एकदा विद्यापीठाकडून उपलब्ध होणार आहे. कौशल्यावर अधारीत कोर्स सुरू करण्याचा मानस असून ‘पोर्ट मॅनेजमेंट’ सारखे कोर्स उपलब्ध देखील आहेत. प्रवाहातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्ञानगंगेत पुन्हा घेऊन येण हा आमचा मुख्य उद्देश असून ‘एआय’ चा वापर शिक्षणासाठी करण्यावरही भर आहे. तर अभ्यासक्रमातील बदलानंतर विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तक मिळवण्यासाठी विलंब होतो ही वस्तुस्थिती असून त्या वर्षानंतर मात्र कोणत्याही प्रकारची अडचण राहत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना 1 जुलै 1989 रोजी नाशिक येथे झाली आहे. महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्या शासकीय सेवा आणि पदोन्नतीसाठी या ग्राह्य धरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. इतर विद्यापीठातील अन्य शिक्षणक्रमांना या विद्यापीठातून घेतलेल्या पदवीनंतर पुढील उच्च शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून 8 विभागीय केंद्रे आणि 1675 पेक्षा जास्त अभ्यासकेंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठाचे 145 पेक्षा जास्त शिक्षणक्रम असून या शिक्षणक्रमांसाठी दरवर्षी साधारणपणे 3.74 लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या विद्यापीठाचे बोधवाक्य ” ज्ञानगंगा घरोघरी ” असून या विद्यापीठाने ज्ञानाची गंगा सर्वदूर पोहोचवून लोकविद्यापीठ होण्याच्या मार्गावर यशस्वी वाटचाल सूरू केलेली आहे. सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेने मुक्त विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगांव आणि गोवा सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी या विभागात एकूण 120 अभ्यासकेंद्रे सुरू असून या अभ्यासकेंद्रांवर जुलै 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध शिक्षणक्रमांचे 22 अभ्यासकेंद्रे कार्यरत असून भविष्यात या जिल्ह्यात विविध शिक्षणक्रमांची अभ्यासकेंद्रे नव्याने सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे ycmou.digitaluniversity.ac.in किंवा ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करत अभ्यासकेंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधूनही आपला प्रवेश निश्चित करता येईल, असे कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. संजय थोरात यांनी सांगितले. तसेच प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी विभागीय केंद्रात मदत कक्ष स्थापन केला असून या ठिकाणी 0231-2991171 / 0231-2991172 आणि मोबाईल क्र. 7447607022 / 7038607023 या दूरध्वनीद्वारे विविध शिक्षणक्रमांची माहिती उपलब्ध करून देत आहोत. या दूरध्वनी सेवेचाही लाभ प्रवेशार्थी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रा. थोरात यांनी केले. यावेळी सहाय्यक सल्लागार विजयसिंह रजपूत, केंद्र संयोजक तुषार वेंगुर्लेकर, यशवंत
पाटील आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page