⚡सावंतवाडी ता.१२-: सातारा येथील विश्वगंगा प्रतिष्ठानने दुस-या मकरंद आबा पाटील चषक राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे सत्तर खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे सावंतवाडी व देवगड येथील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर यांच्यासह चिदानंद रेडकर, आकाश वाटवे, मोहीशा जाधव, चारुल जाधव, तेजस वाटवे या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला. नऊ विदयार्थ्यांपैकी सात विदयार्थ्यांनी पारितोषिके मिळवून राष्ट्रीय स्तरावर मुक्ताई ॲकेडमीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला लौकिक प्राप्त करुन दिला.
स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने रेटिंग कॅटेगरीत तिसरा क्रमांक पटकावला. बाळकृष्णला रोख पारितोषिक, आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नऊ राऊंड्समध्ये बाळकृष्णने सात राऊंड्स जिंकून सात गुणांची कमाई केली. या नेत्रदीपक कामगिरीमुळे बाळकृष्णच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये अकरा गुणांची वाढ झाली. बाळकृष्णसोबतच मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडी व देवगड येथील इतर विदयार्थ्यांनीही या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. यामध्ये तेरा वर्षीय हर्ष राऊळ याने साडेपाच गुण मिळवून पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक मिळवला. हर्षच्या या चमकदार कामगिरीमुळेच त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये तब्बल सतरा गुणांची वाढ झाली. तेरा वर्षीय पुष्कर केळूसकर याने पाच गुण मिळवून पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात पाचवा क्रमांक मिळवला. बारा वर्षीय चिदानंद रेडकर याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर मात करत पाच गुणांची कमाई करुन तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात नववा क्रमांक मिळवला. ॲकेडमीचा देवगड येथील सात वर्षीय विदयार्थी आकाश वाटवे याने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या खेळाडूंवर विजय मिळवून साडेतीन गुण मिळवत सात वर्षाखालील मुलांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेऊन साडेतीन गुण करणा-या चारुल जाधव हीने पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात आठवा क्रमांक आणि मोहीशा जाधव हीने नऊ वर्षाखालील मुलींच्या गटात तिसरा क्रमांक मिळवला. विजयी खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर आणि मुक्ताई ॲकेडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थ्यांनी हे यश मिळवले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
सातारा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी…
