मच्छिमारांचे नुकसान होण्याची शक्यता;विविध मच्छीमार संघटनांची मागणी
वेंगुर्ला प्रतिनिधी- मच्छीमारांच्या मागणीनुसार मांडवीखाडी मुखाच्या ठिकाणी आधुनिक बंधारा (ब्रेक वॉटर) बांधकामासाठी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे त्रिशंकू आकाराचे दगड हे नवाबाग किना-यावरील भागात अस्ताव्यस्त टाकले गेल्याने पारंपारीक रापण मच्छिमारी व बिगर यांत्रिक मच्छीमारी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्या भागात मच्छीमारी केल्यास मच्छीमारांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सदरची त्रिशंकु दगड तातडीने हटविण्याची मागणी पारंपारिक रापण संघाच्या मच्छीमार आणि व पारंपारिक बिगर यांत्रिक मच्छिमारांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, मालवणचे सहाय्यक मत्स्यआयुक्त यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर व स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. नवाबाग-उभादांडा भागातील रापण लावण्याच्या ठिकाणी चार रापणी आळीपाळीने रापण एकाच जागी रापण लावतात. या रापण संघात सुमारे ४० ते ४५ सदस्य असतात. त्यामुळे सुमारे २०० कुटुंबांचा उदरनिर्वाह या पारंपारिक रापण व्यवसायावर पूर्णतः अवलंबून आहे. तसेच मांडवीखाडी मुखाशी साचणा-या गाळाला प्रतिबंध करणारा अत्याधुनिक बंधारा ब्रेक वॉटर व्हावा अशी गेल्या कित्येक वर्षांची मागणी होती. त्यास अनुसरून २०१९-२० बंधारा मंजूर झालेला आहे. बंधा-यासाठीचे सामान जोडणीचा एक भाग म्हणून सदर काम घेतलेल्या ठेकेदाराने जागेवर सिमेंटचे त्रिशंकू आकाराचे वजनदार टनाच्या वजनाचे दगड तयार करून समुद्रालगत ज्या जागेवरून राखण्याची मासेमारी केली जाते त्याच जागी अस्ताव्यस्त टाकलेले आहेत. त्यामुळे आपण व्यवसाय पूर्णतः अडथळा निर्माण होऊन रापणीची मासेमारी करणे अशक्यप्राय, जीवघेणी, धोकादायक आणि जोखमीची झालेली आहे. हंगामी मासेमारी करीता तात्पुरत्या स्वरुपात बंधा-याचे ख-या अर्थाने काम सुरू होईपर्यंत अवास्तव टाकलेले दगड उचलून नजिकच्या जागी ठेवण्याबाबत याबाबत आम्ही विनंतीपूर्वक ठेकेदार यांना सांगूनही आजपर्यंत त्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बंधा-याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे ही आमची आग्रही मागणी आहे. आम्ही पारंपारिक रापणकार मच्छिमारांनी मासेमारी केल्यास जाळी दगडावर पडून किंवा रापण नौका दगडावर आदळून वित्तहानी किंवा जिवीतहानी होऊ शकते. तसे झाल्यास रापणकार मच्छीमारांच्या कुटुंबातील बायका मुलांना त्या सिमेंटच्या त्रिशंकु दगडावर डोकी फोडून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे अवास्तव टाकलेले सिमेंटची त्रिशंकू दगड तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करून रापण मच्छिमारीसाठीची जागा मोकळी करावी. अशी मच्छिमारांची मागणी असल्याचे जेष्ठ रापण संघाचे मच्छीमार सुबोध खडपकर व उत्तम आरोंदेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. फोटोओळी – ब्रेकवॉटरसाठी बनविलेले दगड अस्ताव्यस्त पडले आहेत.
