उद्योगपती नामदेव मराठे यांचे मुंबईत निधन

*💫कणकवली दि.०८-:* फोंडाघाट येथे ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाची स्थापना करून फोंडाघाटच्या माळरानावर कृषीनंदवन फुलविणारे सुप्रसिद्ध उद्योगपती, शिक्षणप्रेमी नामदेव राजाराम मराठे ( वय 60 ) यांचे मुंबई येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 8 जुलै रोजी सकाळी निधन झाले. नामदेव राजाराम मराठे यांच्या निधनाने अत्यंत दानशूर आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपले असून एकूणच समाजाची फार मोठी हानी झाली आहे. मागील काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. कणकवलीतील खाजगी रुग्णालयात काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. मुंबईतील खाजगी रुग्णलयात उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. घोणसरी गावचे सुपुत्र असलेले नामदेव मराठे यांनी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील आपला व्यवसाय सांभाळतानाच आपल्या मूळ गावी घोणसरी येथे येत ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाची स्थापना केली. दापोली कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषितंत्र पदविका विद्यालय, कृषी महाविद्यालय, ज्युनिअर विज्ञान कॉलेज, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ निगडित कॉलेज च्या माध्यमातून फोंडघाट दशक्रोशी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. धार्मिक, शैक्षणिक, सामजिक क्षेत्रात तर नामदेव मराठे यांची दानशूर व्यक्ती म्हणून ख्याती आहे. ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामजिक उन्नती मंडळ अंतर्गत श्रमसाफल्य संकुल उभारून जिल्ह्यातील शेकडो गरजूंना त्यांनी रोजगार मिळवून दिला. अपार कष्टाने नामदेव मराठे यांनी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचा वटवृक्ष उभा केला. आपल्या गावाची आणि कॉलेजची त्यांना फार मोठी ओढ होती. त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजताच घोणसरीसह फोंडाघाट दशक्रोशी आणि जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा दीपेश, सून, मुलगी रचना असा परिवार आहे.

You cannot copy content of this page