कासार्डे ,तळेरे परिसरात पाऊसाची दांडी ;शेतकरी चिंताग्रस्त

*💫कणकवली दि.०७-:* कासार्डे -तळेरे परिसरात गेल्या आठवड्यापासून पाऊसाने दांडी मारल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत. जर अजून काही दिवसांत पाऊस पडला नाही तर तरवाही करपून जाण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. ऐन रोप लावणीच्या कामाला वेग येताच पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला. लावणीसाठी योग्य झालेला तरवा पाण्याअभावी सुकून जाण्याच्या भीतीपोटी ओहोळ बांधून तर काहीजण रॉकेल, डिझेल इंजिन लावून रोपांची लावणी करताना निर्दशनास येत आहे.ज्या शेतकऱ्यांना तरवा लावला आहे त्या जमीनीलाही पावसाअभावी भेगा पडू लागल्या आहेत. पुढील काही दिवसात पावसाचे आगमन झाले नाहीतर शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ होणार आहे.यावर्षी वेळेत आणि भरपूर प्रमाणात तळेरे-कासार्डे परिसरात पाऊस झाल्याने भात पेरणी वेळेवर झाली होती. आजचे दिवस म्हणजे जोरदार लावणीचे दिवस पण ऐन लावणीत पाऊसाने उसंत घेतल्याने महागडी बी- बीयाने, खते व मशागतीच्या खर्च फुकट जाण्याची भिती शेतकरी वर्गाला वाटत आहे.पेरणी झाल्यानंतर महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असल्याने जर वेळेत रोप लावणी न झाल्यास तरवा जास्त पाळेमुळे घेऊन उपटणे कठीण होईल आणि शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागेल.काही शेतकरी ओहोळावर बांध घालून किंवा शक्य आहेत तेथे रॉकेल, डिझेलचा पंप लावून पाणी आपल्या शेतात आणण्यासाठी धडपडत करताना दिसत आहे. मात्र अनेक शेतकरी एखाद्या चातकाप्रमाणे पाऊस कोसळण्याची वाट पहात आहेत. *शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना!* आज सर्वत्र कोरोनासाथ व लाॅकडाऊनमुळे महागाई उच्चांकी वाढलेली आहे.यावर्षी पॉवर टिलरचा तासही महागला आहे. सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीत भयानक वाढ होत असलेल्याने पॉवर टिलरचा तासही पन्नास रुपयांनी वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना याही संकटाला सामोरे जावे लागते आहे. बीयाने,खतांच्या किमतीही वाढलेल्या आहेत. एकीकडे महागाईत होरपळला जाणारा शेतकरी आणि त्यात पाऊसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसाठी दूष्काळात तेरावा महिना आल्याची स्थिती झाली आहे. निदान यावर्षी तरी निसर्गाने सुरळीतपणे साथ दिली तरच शेतकरी वाचेल अन्यथा शेतकऱ्यांची फार बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. .

You cannot copy content of this page