आंबडोस सरपंचांनी मानले जिल्हा परिषद अध्यक्षाचे आभार

गाव जोड़ला चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला;सीईओ नायर, तत्कालीन आरोग्य सभापती सौ लोके यांनाही दिले आभारपत्र

*💫ओरोस दि.०२-:* मालवण तालुक्यातील आंबडोस गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडल्याने सरपंच राधा वरवडेकर यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आणि तत्कालीन आरोग्य सभापती सावी लोके यांचे आभारपत्र देवून आभार व्यक्त केले. आंबडोस गाव मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न होते. मात्र, मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आंबडोस गाव यामध्ये सुमारे १० किमी अंतर आहे. त्यामुळे दैनंदिन आरोग्य सुविधा घेण्यासाठी मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे भौगोलिक दृष्टया त्रासदायक होते. तसेच खर्चिक सुद्धा होते. त्यामुळे येथील नागरिकांची आपला गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्याची मागणी होती. अनेक वर्षे मागणी करूनही यश येत नव्हते. त्यामुळे सरपंच राधा वरवडेकर यानी नव्याने प्रस्ताव करीत पुन्हा मागणी केली होती. त्यानुसार त्याला पंचायत समितीच्या मासिक सभेत, जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत व जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यानी त्याप्रमाणे आदेश काढले. यामुळे आंबडोस गाव वासियांची अनेक वर्षाची मागणी मान्य झाली आहे. आपल्या गावाची मागणी मान्य करीत आरोग्य सेवा नजिक उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सौ वरवडेकर यानी शुक्रवारी जिल्हा परिषदेत येत अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन आरोग्य सभापती सौ लोके यांचे आभारपत्र देत आभार व्यक्त केले आहेत. यावेळी अध्यक्षा सौ सावंत यांनी आंबडोस गावाला लागणारे विकासात्मक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंचा सौ वरवडेकर यांनी त्यांच्याशी विकासात्मक मुद्दे घेवून चर्चा केली.

You cannot copy content of this page