सोनवडे घाटमार्गाचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन छेडणार:प्रा.महेंद्र नाटेकर

बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अभियंत्यांवर कठोर कारवाईची मागणी

*💫कणकवली दि.०२-:* पालकमंत्री एस्.एन्.देसाई यांनी सोनवडे दशक्रोशीतील जनतेच्या मागणीनुसार १९८५ साली गारगोटी सोनवडे – घोटगे – पणदूर वेंगुर्लामठ हा हायवे मंजूर केला . त्यानुसार गारगोटीपासून सोनवडे घाटमार्गापर्यंत तसेच सोनवडे घाटपायथ्यापासून पणदूरपर्यंत हायवे निर्माण करण्यात आला . तसाच साडेआठ कि.मि. हायवे निर्माण करणे आवश्यक होते.आणि मग सरळमार्गाने छोटी – मोठी अवजड वाहने सहज गेली असती . पण तसे न करता मोठमोठाले उंचवटे असणारा , सरळ न दिसणारा वाकडा -तिकडा , फक्त छोटी – छोटी वाहने जाऊ शकणारा घाटमार्ग तयार केला असे आक्षेप सार्वजनिक बांधकाम शाखेच्या रेखाचित्र शाखेने नोंदविले आहेत . त्यामुळे सोनवडे घाटमार्गाने काम लांबणीवर पडले आहे . याला संबंधित इंजिनिअर जबाबदार असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करुन अन्य तज्ञ इंजिनिअर्स मार्फत शासनाने दिलेल्या एक महिन्याच्या मुदतीत अपेक्षित घाटमार्गाचे काम पूर्ण करावे , अशी लाखो ग्रामस्थांची मागणी आहे . अन्यथा प्रचंड मोठे आंदोलन केले जाईल , असा इशारा सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे. सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीची बैठकीत प्रा.नाटेकर बोलत होते . यावेळी सत्यवान ढवळ , संदेश बिले , गणेश बुटाले , निलेश तेली , विलास सदडेकर , दाजी तवटे , शरद गुरव , संजय पवार , सुधा बांदेकर , बाळा राणे , भिवा घाडीगावकर , काशिराम घाडीगांवकर , पंढरी गुरव , संतोष घाडी , विलास चाफेकर , भगवान शिंदे इत्यादी सदस्य उपस्थित होते . प्रा.नाटेकर पुढे म्हणाले कोल्हापूरकडे जाणारे फोंडा , करुळ , भुईबावडा इत्यादी घाटमार्ग अवघड आहेत . यांची उंची फार आहे . दहा – पंधरा वळणे प्रत्येक घाटमार्गाला आहेत . दरवर्षी पावसाळ्यात घळणी कोसळून वाहतूक ठप्प होते.वाहतूक सुरळीत करण्यात बराच वेळ जातो.अपघातही होतात त्यात आतापर्यंत बऱ्याच व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून शेकडो प्रवासी अपंग झाले आहेत . म्हणून फारशी उंची नसलेल्या दोन – तीनच वळणे असणाऱ्या , कोल्हापूरचे सुमारे १५ कि.मी.नी अंतर कमी करणाऱ्या सोनवडे घाट मार्गाची जनतेने मागणी केली . आजही लोक डोक्यावर ओझी घेऊन घोटगे बाजाराला ये – जा करतात.एवढा सोपा , कमी उंचीचा घाटमार्ग महाराष्ट्रात अन्यत्र क्वचितच असेल , अशा घाटमार्गाला हायवेची मंजुरी देण्यात आली . आवश्यक तो पैसा आशियायी फंडातून मंजूर करण्यात आला . अशा ह्या घाटमार्गाचे प्रशासनाने मातेरे केले. ह्या घाटमार्गासाठी एक हजार कोटींहून अधिक खर्च शासनाला करावा लागणार त्याचा परतावा शासनाला कसा मिळणार याची चिंता प्रशासनाने करु नये , तो आमचा जनतेचा पैसा आहे . तो वाया जाऊ नये म्हणून बांधकाम खात्याच्या सचिवांनी अधून मधून पाहणी करुन संबंधित इंजिनिअर्सना मार्गदर्शन केले असते तर ही वेळ आली नसती . संबंधित इंजिनिअर्स एवढेच बांधकाम खात्याचे सचीवही जबाबदार आहेत , आता शासन – प्रशासनाने घाटमार्गातील दोष दूर करुन प्रत्यक्ष घाटमार्गाचे काम सुरु करावे , ब्रिटीश सरकारने फोंडा , करुळ इत्यादी अवघड घाटमार्ग चार – पाच वर्षात पूर्ण केले आणि गेल्या ४०-४५ वर्षात महाराष्ट्रात घाटमार्ग पूर्ण होत नाही या बद्दल शासन प्रशासनाची कीव करावी तेवढी थोडीच आहे ! झालेल्या चर्चेत उपस्थित सर्वांनीच सहभाग घेतला आणि सोनवडे घाटमार्गाचे काम त्वरीत सुरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला .

You cannot copy content of this page