केसरकरांनी प्राधान्यक्रम बदलावा – विलास सावंत…
⚡बांदा ता.२३-:“सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला शिर्डीच्या धर्तीवर नव्या साईबाबा मंदिराची गरज नाही. जिल्ह्याला सर्वाधिक गरज आहे ती अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची. आमदार दीपक केसरकर यांनी धार्मिक प्रकल्पांच्या घोषणांपेक्षा आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे,” अशी टीका सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केली आहे.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत गोव्यातील उद्योजक पैकाणे यांनी आडाळी एमआयडीसीमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून सहा एकर जागेत उद्योग प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. याचवेळी सावंतवाडीत शिर्डीच्या धर्तीवर भव्य साईबाबा मंदिर उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विलास सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.
श्री सावंत म्हणाले, “सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात ग्रामदैवतांची मंदिरे असून नागरिकांची त्यांच्यावर अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे आणखी एक मोठे धार्मिक स्थळ उभारण्यापेक्षा जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आजही गंभीर आजारांवरील उपचारांसाठी सिंधुदुर्गवासीयांना गोवा किंवा अन्य शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.”
औद्योगिक विकासाबाबतही त्यांनी भूमिका मांडताना सांगितले की, आडाळी एमआयडीसीमध्ये मोठी गुंतवणूक होणे स्वागतार्ह असले तरी तेथील उद्योग स्थानिक युवकांना गुणवत्तापूर्ण आणि कायमस्वरूपी रोजगार देणारे असावेत. केवळ एमआयडीसीमध्ये उद्योग आणल्याचा दावा करण्यासाठी प्रकल्प उभारण्यापेक्षा रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या उद्योगांना प्राधान्य द्यावे. आडाळी एमआयडीसीमध्ये अद्याप अनेक उद्योग येण्यासाठी धजावत नसल्याचे वास्तव तसेच कुडाळ एमआयडीसीची सद्यस्थिती लक्षात घेऊन औद्योगिक धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षण क्षेत्रातील घसरत्या पटसंख्येबाबतही सावंत यांनी चिंता व्यक्त केली. एकेकाळी शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय घटत असून, कोकणातील भौगोलिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक धोरणात बदल करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या गंभीर विषयाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“कालानुरूप जिल्ह्याच्या गरजा ओळखून आरोग्य, शिक्षण आणि शेतीपूरक उद्योगांवर भर देणे ही काळाची गरज आहे. सिंधुदुर्गातील फळबागायतदारांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, स्थानिक युवकांना रोजगार मिळेल आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने प्रयत्न करावेत,” असे आवाहन विलास सावंत यांनी केले आहे.
