⚡मालवण,ता.०७-:
स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहराची स्वच्छता राखत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची समाजाने सदैव जाणीव ठेवली पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांनी येथे बोलताना केले.
मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेतील २५ कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष लुडबे म्हणाले की, “आपण आपल्या घराची स्वच्छता करतो; मात्र शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वच्छता कर्मचारी निष्ठेने पार पाडतात. ऊन, पाऊस, आजारपणाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या श्रमाला सलाम करण्याबरोबरच त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही समाजाची जबाबदारी आहे असे ते म्हणाले
या उपक्रमासाठी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे सेवानिवृत्त प्राध्यापक आर. एन. काटकर आणि वैभवी नरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. फाउंडेशनच्या या उपक्रमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या काळात किराणा साहित्याची मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक संदीप नेवाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, गणेश लुडबे, संदीप लुडबे, शिक्षक संदीप नेवाळकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, संजय हंजनकर, विजय मेस्त्री, माजी नगरसेवक जयमाला मयेकर, दुर्वा निर्गुणी आदी उपस्थित होते.
