शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बाजार समित्यांना दक्षतेच्या सूचना..
⚡सिंधुदुर्ग,२८-: शेतकऱ्यांची शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक होऊ नये, तसेच विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी शेतमालाच्या व्यापाराबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी आणि कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.
परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदीची परवानगी
अधिसूचित शेतमालाची खरेदी करण्यासाठी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून मिळणारा खाजगी बाजार परवाना, थेट पणन परवाना किंवा एकल बाजार परवाना अथवा संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीचा व्यापारी अनुज्ञप्ती/खरेदीदार परवाना असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकताना संबंधित व्यापाऱ्याकडे वैध परवाना असल्याची खात्री करावी.
काही शेतमालाच्या बाजार आवाराबाहेरील व्यवहारांवर नियमनातून सूट
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवाराबाहेर फळे व भाजीपाला यांतील अधिसूचित नोंदी तसेच मसाल्याच्या व इतर पदार्थांच्या यादीतील आले, लसूण, धणे आणि मिरची या शेतमालाच्या खरेदी-विक्रीला नियमनातून सूट देण्यात आली आहे. तथापि, हा शेतमाल अधिसूचित असल्याने त्याची बाजार आवाराबाहेर खरेदी करण्यासाठी संबंधित बाजार समितीचा व्यापारी अनुज्ञप्ती/खरेदीदार परवाना किंवा थेट पणन, खाजगी बाजार अथवा एकल बाजार परवाना आवश्यक आहे. या व्यवहारांवर बाजार समितीला बाजार शुल्क आकारता येणार नाही.
विनापरवाना व्यापार करणाऱ्यांवर कारवाई
कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा व्यवहारांना आळा घालण्यासाठी अधिनियमातील कलम ४६ व ५२ अन्वये उपलब्ध अधिकारांचा वापर करून नियमानुसार कारवाई करावी.
जाहीर लिलाव आणि पावती देणे बंधनकारक
कृषि उत्पन्न बाजार समित्या आणि खाजगी बाजारांच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची खरेदी जाहीर लिलावाद्वारे होईल, याची दक्षता संबंधित समित्या व खाजगी बाजारांनी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाचे नाव, वजन, बाजारभाव आणि शेतकऱ्याला देय असलेली रक्कम यांचा तपशील नमूद असलेली पावती देणे प्रत्येक व्यापाऱ्यास बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांनी परवानाधारक व्यापाऱ्यांनाच शेतमाल विकावा
शेतकऱ्यांनी विनापरवाना व्यापाऱ्यांना शेतमाल विकू नये, यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी जनजागृती करावी. शेतमाल विक्रीपूर्वी व्यापाऱ्याचा वैध परवाना तपासावा आणि व्यवहाराची पावती घ्यावी. यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहून शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्यास मदत होईल.
000000

