मनीष दळवी:दुग्ध संस्थांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे गट तयार करावेत:जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट..

⚡सिंधुदुर्ग दि.२८-: जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दुधाळ जनावरे खरेदीसाठी प्रोत्साहित करावे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वोतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात आयोजित दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. यावेळी दळवी म्हणाले की, गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय विकसित करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडून त्यांचा गट तयार करावा. प्रत्येक गावात अशा प्रकारे गट निर्माण झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ जिल्हा बँक उपलब्ध करून देईल.
दुधाळ जनावरे खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करताना दुग्ध संस्थांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून लाभार्थी निवडणे शक्य असले, तरी निवडलेले शेतकरी प्रत्यक्ष दुग्धव्यवसायाशी जोडले जातीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दुग्ध संस्थांशी संबंधित असलेल्या, दुग्धव्यवसायाचा अनुभव आणि आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जनावरांची योग्य काळजी घेण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य द्यावे. लाभार्थ्यांची योग्य निवड करण्यासाठी दुग्ध संस्थांचा अनुभव आणि सहभाग महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असून, चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही विचार सुरू आहे. तसेच शासनाच्या सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्येक दूध उत्पादकाला किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. दूध संकलनात वाढ करणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत जिल्हा बँक सकारात्मक असून, यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
बँकेचा उद्देश नफा मिळविणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. दुग्ध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीला बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्धव्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
