Headlines

निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत

सिंधुदुर्ग, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तीवेतन डिसेंबर 2026 पासून संगणक प्रणालीद्वारे आपोआप स्थगित करण्यात येणार आहे.
शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत संबंधित निवृत्तीवेतनधारकांच्या याद्या त्यांच्या निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकांकडे पाठविण्यात आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करून हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी जीवन प्रमाण (https://jeevanpramaan.gov.in)या संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच 1 नोव्हेंबर 2026 पासून ‘महा-उपलब्धी’ या मोबाईल ॲपवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मनीऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन स्वीकारणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत हयातीचे दाखले टपालाद्वारे घरपोहोच पाठविण्यात येतील. संबंधितांनी या दाखल्यावर पोस्टमास्तर किंवा शासकीय राजपत्रित अधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन तो जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावा.
1 नोव्हेंबर 2026 पूर्वी सादर केलेले हयातीचे दाखले ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी विहित कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत.

000000

You cannot copy content of this page