Headlines

गजाभाऊ मेहेंदळे लिखित ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ ग्रंथाचे शुक्रवारी कुडाळमध्ये प्रकाशन…

सहा शिवप्रेमी संघटना आणि शिवशंभू विचार मंचाचा संयुक्त उपक्रम:मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची उपस्थिती..

⚡कुडाळ ता.२८-: मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ इतिहासकार स्व. गजानन भास्कर मेहेंदळे (गजाभाऊ) लिखित ‘औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल’ या संशोधनपर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शिवशंभू विचार मंच (कोकण प्रांत) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा प्रमुख शिवप्रेमी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंचाचे कोकण प्रांत संयोजक भूषण साटम यांनी दिली.
कुडाळ एमआयडीसी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रमाकांत नाईक, बंड्या सावंत आणि श्री. म्हाडेश्वर उपस्थित होते.
स्व. गजानन मेहेंदळे यांनी मोडी, फारसी आणि पोर्तुगीज यांसारख्या समकालीन भाषांतील मूळ कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून हा ग्रंथ सिद्ध केला आहे. शिवचरित्र आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे पुराव्यांच्या आधारे खंडन करण्याबरोबरच, औरंगजेबाचे धार्मिक धोरण आणि १६५८ ते १७०७ या कालखंडातील त्याच्या कारकिर्दीचा तत्कालीन मुघल दफ्तरांतील कागदपत्रांच्या आधारे तटस्थपणे आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे, असे भूषण साटम यांनी सांगितले.
या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवशंभू विचार मंचाचे राष्ट्रीय संयोजक तथा शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक सुधीर थोरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमात शिवशंभू विचार मंच (कोकण प्रांत), शिवक्रांती संघटना, सिंधुदुर्ग प्रतिष्ठान (मालवण), सह्याद्री प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग), दुर्गवीर मावळा प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (सिंधुदुर्ग) या संघटनांचा सहभाग आहे.
दरम्यान, अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारित इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील हिंदू कॉलनीमध्ये रविराज पराडकर यांचे ‘शिवराय आणि त्यांची युद्धनीती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांना इतिहासाचे अभ्यासक, वाचक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page