Headlines

कुडाळमध्ये महामार्गावर ट्रकला दुचाकीची धडक; चालकाचा मृत्यू

लेमनग्रास हॉटेलसमोर अपघात

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलसमोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कुडाळ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर लेमनग्रास हॉटेलसमोर ट्रक रस्त्यालगत उभा होता. याचवेळी कुडाळच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार भूषण कुडाळकर गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

You cannot copy content of this page