बांद्यात १ नोव्हेंबरला मतदान; सायंकाळीच निकाल जाहीर होणार

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा पंचक्रोशीच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत बांदा ग्रामपंचायतीच्या सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज बांदेकर यांनी दिली.
मंचाच्या एकूण ११ जागांपैकी नऊ जागा पुरुषांसाठी, तर दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. सत्ताधारी श्री देव बांदेश्वर आघाडीकडून पुरुष गटात महादेव बांदेकर, हरिश्चंद्र भिसे, उत्तम देसाई, भिकाजी धुरी, हनुमंत मालवणकर, गुरुनाथ नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, प्रकाश शिर्के आणि महादेव वसकर हे नऊ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महिला राखीव गटातून निकिता मोरजकर आणि अर्चना सावंत या उमेदवार रिंगणात आहेत.
अपक्ष उमेदवारांमध्ये सुकाजी गावडे, अशोक परब, महादेव सावंत आणि अनुराधा मोर्ये यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या या निवडणुकीकडे बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर त्याच दिवशी निकाल स्पष्ट होणार असल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.
