Headlines

२८२ पदांची जाहिरात, प्रत्यक्षात १६९ जण हजर

ओरोस, ता. ७ :
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित राहिले. तर १९ जण अनुपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्या उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे भरतीपूर्वी ३५२ उपशिक्षकांची पदे रिक्त होती. शासनाने रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिल्यानंतर त्यानुसार जिल्हा परिषदेकडून २८२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पवित्र पोर्टलद्वारे राबविलेल्या या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना जिल्हा पसंतीची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्गला पसंती दिली होती.
या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ३ आणि ५ सप्टेंबरला करण्यात आली. त्यासाठी १८८ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. प्रत्यक्षात १६९ उमेदवार उपस्थित राहिले. यातील काही उमेदवारांच्या कागदपत्रांशी संबंधित बाबींवर अंतिम निर्णय बाकी असून, अन्य उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

You cannot copy content of this page