Headlines

गणेशोत्सवाच्या तोंडावर कासमध्ये ‘ओंकार’ हत्तीची पुन्हा एन्ट्री

पंडितवाडीत वावर; शेतकरी भीतीच्या छायेखाली

⚡बांदा ता.०८-: गेले काही दिवस नेतर्डे-गाळेल परिसरात स्थिरावलेला ‘ओंकार’ हत्ती आज पहाटे कास गावात दाखल झाला आहे. कास येथील पंडितवाडी परिसरात त्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी ओंकार हत्तीने कास गावात धुमाकूळ घालत शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर तो परिसरातून दूर गेल्याने शेतकऱ्यांनी काहीसा दिलासा घेतला होता. मात्र, आता पुन्हा त्याने कास गावात प्रवेश केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्या गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला असून शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत ओंकारचा गावात पुन्हा वावर सुरू झाल्याने शेतात जाण्यासही शेतकरी धजावत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्तीच्या हालचालींची भीती असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वनविभागाने ओंकार हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला मानवी वस्तीकडून सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने वळवावे, तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. यापूर्वी झालेल्या शेती-बागायतीच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page