Headlines

नांदगाव पंचक्रोशीत माकड पकड मोहीम राबवा…

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची वनविभागाकडे मागणी:माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त..

⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील असलदे, नांदगाव, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी तसेच परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त झाले असून, त्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने तातडीने अधिकृत माकड पकड मोहीम राबवावी, अशी मागणी असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची कणकवली वनविभागाकडे करण्यात आली आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिले आहे.
माकडांकडून घरांमध्ये घुसून अन्नपदार्थांची नासधूस करण्याबरोबरच घरावरील कौले, पत्रे व इतर साहित्याचे नुकसान केले जात आहे. तसेच शेतातील भाजीपाला, फळझाडे आणि विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माकडांकडून नागरिकांना इजा होण्याची शक्यता असून, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वन विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
या पार्श्वभूमीवर नांदगाव पंचक्रोशीतील माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने अधिकृत व नियमानुसार माकड पकड मोहीम राबवावी. माकडांना सुरक्षितपणे पकडून योग्य ठिकाणी स्थलांतरित करावे, तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व अधिकृत पथक तातडीने पाठवून कार्यवाही करावी, अशी मागणी भगवान लोके यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page