Headlines

आरोग्य शिबिरांमुळे सिंधुदुर्गातील आरोग्यसेवेला नवी गती; रिक्त पदेही लवकर भरणार – नितेश राणे

ओरोस ता २३
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या शिबिरांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक गतिमान झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू असलेल्या विशेष आरोग्य शिबिराची पाहणी करून त्यांनी विविध विभागांची माहिती घेतली. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पाहणीदरम्यान मंत्री राणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकासकामांचाही आढावा घेतला. सिंधुदुर्गातील रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, उपचारासाठी जिल्ह्याबाहेर रेफर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासह विविध आरोग्य संस्थांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांद्वारे मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि जनजागृती कार्यक्रम राबविले जात असून नागरिकांना आरोग्यसेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार असून आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व बळकट करण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, महेश पारकर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page