Headlines

सरकारी नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणीला गंडा

दोन लाखांहून अधिकची फसवणूक:संशयीताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

कणकवली : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीला शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २ लाख २४ हजार ६५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (वय ५२, रा. तोंडवली) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

कणकवलीतील पदव्युत्तर (एम.कॉम.) शिक्षण पूर्ण केलेली तरुणी शासकीय नोकरीच्या शोधात होती. याच संधीचा फायदा घेत श्रीकृष्ण कुडतरकर याने स्वतःची ओळख लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (अँटी करप्शन) अधिकारी अशी करून दिली. एवढेच नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातील गोपनीय विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती करून देण्याचे आश्वासन देत त्याने दोन लाख रुपयांची मागणी केली.

सरकारी नोकरी निश्चित मिळेल, या विश्वासाने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी २ ऑक्टोबर ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये संशयिताच्या बँक खात्यावर जमा केले. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतरही नियुक्तीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट वेळोवेळी विविध कारणे सांगून संशयिताने टाळाटाळ सुरूच ठेवली. अखेर नोकरी मिळत नसल्याने आणि पैसे परत देण्यासही संशयिताने नकार दिल्याने पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांना फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलीस तपासात श्रीकृष्ण कुडतरकर हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कोणत्याही पदावर कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. शासकीय अधिकाऱ्याचे खोटे सोंग घेऊन बेरोजगारांकडून पैसे उकळण्याचा डाव त्याने रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी बुधवारी त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.

गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत संशयिताकडून अशाच प्रकारे आणखी किती बेरोजगारांची फसवणूक झाली आहे, आर्थिक व्यवहारांची व्याप्ती किती आहे आणि त्याला इतर कोणाची साथ होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचाही तपशील देखील पोलीस पडताळून पाहत आहेत.

You cannot copy content of this page