Headlines

आषाढी एकादशीनिमित्त श्री देव विठ्ठल-रुक्माई मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

सावंतवाडी, ता. २४ : येथील श्री देव विठ्ठल-रुक्माई मंदिरात आषाढी महाएकादशीनिमित्त शनिवार, २५ जुलैपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती व महापूजा होणार आहे. महापूजेचे मानकरी शेखर गुरुनाथ धारगळकर व नगरसेविका सौ. शर्वरी शेखर धारगळकर असतील. सकाळी ११.३० ते दुपारी २ या वेळेत श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचा भक्ती संगीत कार्यक्रम होईल. दुपारी २ ते ३ या वेळेत श्री कालिका देवी भजनी मंडळ, कारिवडे यांचे भजन, तर दुपारी ३ ते ४ या वेळेत महिला मंडळ, सावंतवाडी यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत पंडित योगेश बोरघाटे (माणगाव) यांचा सुश्राव्य संगीत कार्यक्रम रंगणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. विलासबुवा गरवरे (कुरोली सिद्धेश्वर, सातारा) यांचे कीर्तन होईल. रात्री ९ नंतर श्रींचा पालखी सोहळा पार पडणार आहे.
रविवारी व सोमवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. विलासबुवा गरवरे यांची कीर्तने होणार असून, त्यानंतर श्रींची पालखी सेवा होईल. मंगळवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. सौ. सिद्धी मेस्री (ओटवणे) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनभूषण ह.भ.प. श्री हृदयनाथ गावडे (साळगाव) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
आषाढी महाएकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव विठ्ठल-रुक्माई मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page