Headlines

देवबागच्या सागर सारंग यांना राज्यस्तरीय ‘नृत्यजीत पुरस्कार-२०२६’

नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्यात राज्यस्तरीय सन्मान

कुडाळ : राज्यस्तरीय कर्तुत्ववान पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अंतर्गत नृत्यजीत या राज्यस्तरीय पुरस्काराने मालवण तालुक्यातील देवबाग तारकर्ली येथील नृत्य दिग्दर्शक सागर दिनकर सारंग यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले. जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष डान्स स्टुडिओज् यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
  नृत्य दिग्दर्शक सागर सारंग हे गेली बरीच वर्षे नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झालेला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच झालेल्या केळकर कॉलेजच्या ढोलनाच आदिवासी लोकनृत्याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत मुंबई कुर्ला येथे झालेल्या युथ फेस्टिव्हलमध्ये राज्यातील ६० कॉलेजमध्ये विजेतेपद मिळवले आणि हे कॉलेज सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक सागर सारंग, यांचे सहकार्य लाभले होते. केळकर कॉलेजच्या या नृत्याची विशेष सादरीकरणासाठी जम्मू काश्मीर येथे आरोह नॅशनल युथ फेस्टिव्हलसाठी निवड झाली होती.
सारंग यांना महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी, पुणे येथे नृत्यजीत हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अध्यक्ष मेघराज राजेभोसले  प्रमुख अतिथी विशिष्ट सेवा पदक विजेते एअर मार्शल भूषण गोखले, डेप्युटी कमिशनर ऑफ महाराष्ट्र पोलीस (नि.) जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन अध्यक्ष शहाजीराव पाटील, आयोजक आशुतोष  संकायेपाटील, निर्माता अभिजीत संकायेपाटील, अध्यक्षा  भूमाता ब्रिगेड, सामाजिक कार्यकर्त्या सौ. तृप्ती देसाई, गौरवी सारंग विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.
  यावेळी बोलताना आशू संकायेपाटील म्हणाले, श्री नृत्य ही केवळ कला नसून ती एक संस्कार, साधना आणि जीवनशैली आहे. या कलेच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि पुढील पिढ्यांमध्ये तिचा झेंडा उंचावण्यासाठी जे कार्य आपण गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे करत आहात त्याला आमचा मनःपूर्वक सन्मान. आपण नृत्यकलेच्या माध्यमातून समाजाला एक सकारात्मक दिशा दिली. कलाकार घडवताना आपण माणूस घडवला, आणि हीच खरी गुरुची ओळख असते. आपल्या समर्पित कार्यामुळे नव्या पिढीत आत्मविश्वास, अभिव्यक्तीची ताकद आणि नयनरम्य सौंदर्यदृष्टी निर्माण झाली हे कार्य अभूतपूर्व आहे.हीच प्रेरणा लक्षात घेऊन, “नृत्यजीत पुरस्कार- २०२६” हा राज्यस्तरीय गौरव, प्रामाणिक, अभ्यासू, हृदयस्पर्शी आणि समाजाभिमुख नृत्य गुरूंना प्रदान करण्यात येत आहे असे सांगितले.

You cannot copy content of this page