माजगावातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी: निवेदन केले सादर..
⚡सावंतवाडी, ता. २३-: ई-पीक नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू असली तरी अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करता येत नसल्याने माजगाव येथील शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने ई-पीक नोंदणी करण्यास परवानगी देण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या पीक विम्यासाठी ई-पीक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, सातबारा उतारा, तांत्रिक अडचणी तसेच ऑनलाइन प्रणालीतील समस्यांमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहत आहेत. परिणामी त्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ई-पीक नोंदणी ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार कार्यालयात सादर करण्यात आले असून, प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
