कृषि क्षेत्राला निधी मिळाल्याशिवाय कोकणातील शेतकरी सधन होणार नाही

चिंदर येथील तालूका कृषि मेळाव्यात माजी खा नीलेश राणेंचे प्रतिपादन

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्राला येणारा कृषी क्षेत्राचा पैसा हा साखर कारखान्यांना आणि उसासाठीच वाटला जात असल्याने इथल्या शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी पैसा आणणार कोण ? कोकणातील शेतकऱ्याला भांडवल मिळवून देण्यासाठी कुणी भांडत नाही. या ठिकाणचे आमदार फक्त शेतात जाऊन उभे राहतात आमदार शेतात उभा राहिला म्हणजे धबधब्यासारखे पैसे येणार नाहीत. त्यासाठी विधिमंडळात भांडावे लागेल पण तसे होत नाही, इथल्या पालकमंत्र्यांनाही कॅबिनेटमध्ये किंमत नाही त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला अशी टीका करीत माजी खासदार निलेश राणे यांनी जोपर्यंत कोकणाकडे कृषी क्षेत्रातला पैसा वळत नाही तोपर्यंत आपला शेतकरी सक्षम होणार नाही असे परखड मत त्यांनी व्यक्त केले राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी गुरुवारी चिंदर ग्रामपंचायत येथे मालवण पंचायत समिती कृषी विभाग व ग्रामपंचायत चिंदर यांच्या सहकार्याने तालुकास्तरीय कृषी मेळावा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मालवण सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, कृषी अधिकारी संजय गोसावी चिंदर सरपंच सौ. राजश्री कोदे, अशोक सावंत,धोंडू चिंदरकर,जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, आचरा सरपंच प्रणया टेमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, सामाजिक वनिकरणच्या वनपाल अश्विनी लोखंडे, बाबा परब, संतोष कोदे, शाम चव्हाण, राजेंद्र कांबळे, कृष्णा पाताडे, विनायक जाधव यांसह चिंदर ग्रामपंचायत चे सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, सुर्यवंशी, कृषी कर्मचारी शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी खा निलेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. प्रारंभी गटविकास अधिकारी श्री जाधव यांनी प्रास्ताविक केले तर राजश्री कोदे आणि दीपक सुर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विषयक मार्गदर्शन ठरणाऱ्या सहा घडी पत्रिकांचे अनावरण केले गेले. नवीन राष्ट्रीय बायोगॅस वसेंद्रिय खत कार्यक्रम, महाराष्ट्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, भात पिक स्पर्धा आदीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार केला गेला. तसेच बाविस हजार जमा केलेल्या सीडबाँलचे वितरण निलेश राणे यांच्या हस्ते केले गेले. ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमानंतर चिंदर दत्त मंदिर येथे बचतगटांना हळद बियाणे वाटप व लागवडी बाबत मार्गदर्शन केले गेले. तर दुपारच्या सत्रात मालवण पंचायत समितीचा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्व पुर्ण असलेल्या मुलांमार्फत गोळा केलेल्या दुर्मिळ होत असलेल्या वृक्षांच्या बाविस हजार बियांचे बनविलेले सीड बॉल फेकण्याचा कार्यक्रम भगवंंतगड किल्ल्यावर पार पडला.

You cannot copy content of this page