नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी
मालवण: मालवण शहराच्या सुधारीत विकास आराखड्यातील सारभूत स्वरुपांच्या १२ बदलांबाबत ५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर ८ आणि ९ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने घेतलेली जाणारी सुनावणी रद्द करून ही सुनावणी कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे. मालवण शहर विकास आराखड्यातील १२ बदलांवर होणाऱ्या ऑनलाईन जनसुनावणीस काही हरकतदारांचा आक्षेप आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनीही ऑनलाईन सुनावणीस नापसंती दर्शवली आहे. तौवते चक्रीवादळानंतर दूरसंचार तसेच इंटरनेट प्रणाली विस्कळीत झाली असल्याने संपर्क प्रस्थापित करण्यात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हरकतदारांना सुनावणीच्या वेळी आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्या कोरोना प्रार्दुभाव कमी होत आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून हळुहळु अनलॉकची सुरुवात झालेली आहे. तरी सदर सुनावणी ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षांनी सहसंचालक नगररचना कोकण विभाग यांच्याकडे केली आहे.
