सर्जेकोट येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत कोळंबकर यांचे निधन

*💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत धाकु कोळंबकर (वय ९१) यांचे शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. सर्जेकोट मिर्याबांदा येथील रहिवासी असणारे यशवंत कोळंबकर हे अखंड रत्नागिरी जिल्हा असताना प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मितीनंतर त्यांनी जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावतानाच विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले. यात प्रामुख्याने रामगड, फणसवाडी, निव्हे, बेळणे, देवबाग या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम राबविल्याने एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. ते विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय शिकवीत असत. देवबाग येथील जि.प प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कोळंबकर यांनी सर्जेकोट विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची स्थापना करून त्याचे काही काळ अध्यक्ष पदही भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवणच्या भंडारी ए.सो. हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. एस.एस. टिकम तसेच गंगाई फार्मा कणकवलीचे सुनील कोळंबकर, गंगाई रिसॉर्ट सर्जेकोटचे मालक विनायक कोळंबकर यांचे ते वडील होत

You cannot copy content of this page