श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा संपन्न

*💫सावंतवाडी दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या २०२०-२१ या हिरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आज संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची सुरुवात २० जून १९६१ रोजी संस्थेचे संस्थापक हीज हायनेस राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी केली. सावंतवाडी संस्थान परिसरातील गरीब शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या एकमेव उद्देशाने आपले पूज्य पिताजी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे शैक्षणिक स्मारक म्हणून त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली. आज साठ वर्षांनंतर या महाविद्यालयाचा हीरक महोत्सव साजरा करीत असताना या ज्ञानरूपी रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या ज्ञानमंदिरात शिक्षण घेऊन आपले करिअर केले आहे. सन २०२०-२१ हे वर्ष महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. तर आज या हिरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज, राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले, राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखनसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे सहसंचालक प्रा डी. टी. देसाई, संस्था सदस्य डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, अॅड. श्यामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सहसंचालक प्रा डी. टी. देसाई यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. देसाई म्हणाले, १९६१ साली सुरू झालेले हे महाविद्यालय आज नॅक अ नामांकन मिळवून मुंबई विद्यापीठाचे बेस्ट कॉलेज अवॉर्ड सिंधुदुर्ग, जिल्ह्यातील लीड कॉलेज अशी बिरुदावली मिळवलेली आहेत. हे महाविद्यालय शैक्षणिक प्रगतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. यामध्ये राजघराण्याचे योगदान फार मोठे आहे. त्याचबरोबर संस्था सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये फार मोठे सहकार्य केल्यानेच आज हे महाविद्यालय नावारूपास आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page