१ जुलैपर्यंत कालावधी: विकास अधिकारी नातू यांची माहिती
जिल्ह्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कोरड वाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू यांनी दिली. पीक उत्पादन वाढीवर भर देण्यासाठी व खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र, वेबिनार, प्रात्यक्षिते, सभा प्रशिक्षण, शिवार फेरी या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषिमंत्री हे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. २१ जून रोजी लागवड तंत्रज्ञान, २२ जून बीजप्रक्रिया, २३ रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापर, २४ रोजी सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, २५ रोजी विकेल ते पिकेल, २८ रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोगनियंत्रणाच्या उपाययोजना,१ जुलै रोजी कृषीदिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही नातू यांनी सांगितले.
