एलसीबी पथकाची दमदार कामगिरी..
वेंगुर्ले : तालुक्यातील भटवाडी येथील इंद्रधनु पार्क परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी एका सराईत घरफोड्या संशयित आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने करण्यात आलेल्या तपासातून या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भटवाडी येथील रहिवासी व शिक्षक प्रदीपकुमार श्यामराव प्रभू व त्यांची पत्नी हे सुट्टीसाठी पुणे येथे गेले असताना त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. ५ जून रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर वेंगुर्ला पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी बासेरुल गुलमोहर शेख (वय ४५, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. शांतीनगर झोपडपट्टी, कळवा) याची ओळख पटवली. गुन्हा घडल्यानंतर आरोपी वास्तव्य लपवून राहत होता. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २१ जून रोजी मुंबईतील कुर्ला परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध राज्यांत घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
एलसीबी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अंगुलीमुद्रा विभाग व सायबर विभागाच्या पथकाने केली.
