पुणे येथे आयोजन ; 22 ते 24 जून पर्यंत प्रशिक्षण.
⚡सावंतवाडी ता.२२-:
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांसाठीच्या विशेष क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रमाला पुणे येथे सुरुवात झाली आहे. या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह एकूण १३ सदस्य सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत येणाऱ्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता वाढवणे, पंचायत राज व्यवस्थेचे सक्षमीकरण करणे आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी रुजू झालेल्यांमध्ये सावंतवाडी पंचायत समितीच्या माननीय सभापती सुश्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह सदस्य जितेंद्र गावकर, उदय पारीपत्ते, मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, प्रशांत सुखी, प्रथमेश सावंत, प्रणाली तिळवे, प्राजक्ता केळुसकर, सदाशिव राणे, नेहा कांबळी आणि महेश धुरी यांचा समावेश आहे.
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), लोकभवन आवार, बाणेर रोड, पुणे येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून ते पूर्णपणे निवासी स्वरूपाचे आहे. दिनांक २२ जून ते २४ जून २०२६ या ३ दिवसांच्या कालावधीत हे प्रशिक्षण चालणार असून, या काळात सर्व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणस्थळीच निवास करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची वेळ रोज सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:१५ अशी असणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाला उपस्थिती लावल्यामुळे, आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती, अचूक प्रशासकीय दिशा आणि लोककल्याणकारी योजनांना बळ मिळणार आहे.
