दत्ता सामंत यांची टीका
*💫मालवण दि.२१-:* राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे स्वतःचे अपयश झाकण्याच्या उद्देशाने कुडाळ मधील राडा त्यांनी जाणूनबुजून घडवून आणला. वैभव दत्ता सामंत यांची टीकानाईक यांनी स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी या राड्या द्वारे कोरोना पेक्षाही महाभयंकर विष पेरले असून आम. नाईकांकडून घडलेला हा प्रकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काळिमा फासणारा आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थानी दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसांपूर्वी कुडाळ मध्ये घडलेल्या राड्याचा समाचार घेतला. यावेळी दत्ता सामंत म्हणाले, पेट्रोल-डिझेलच्या वाढीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे वैभव नाईक म्हणतात. परंतु पेट्रोल डिझेलच्या भाववाढीला केंद्राबरोबरच राज्य सरकारही तेवढेच जबाबदार आहे. नाईक यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी उपक्रमच घ्यायचा होता, तर त्यांनी राणेंच्या पेट्रोल पंपा ऐवजी स्वतःच्या पेट्रोलपंपावर हा कार्यक्रम घेतला असता. मात्र भाजप कार्यकर्त्यांना डिवचुन शांत आणि सुसंस्कृत कुडाळ शहराला गालबोट लावण्यासाठी वैभव नाईक यांनी हे उपद्व्याप केले. यानिमित्ताने जिल्ह्यात छुपा दहशतवाद कोण पसरवतय, हे उघड झालं आहे. या कृतीतून भाजपा समर्थकांना डिवचण्याचा त्यांचा डाव होता. राणेंच्या पंपावर हे आंदोलन केल्यास भाजपाचे कार्यकर्ते त्याठिकाणी येणार नाहीत, त्यामुळे कमी पैशात स्वतःच्या दहा-पंधरा कार्यकर्त्यांना आणून हा उपक्रम करण्याचा डाव त्यांनी आखला होता. मात्र त्यांच्या या आंदोलनाकडे स्वाभिमानी कोकणी माणसाने पाठ फिरविल्याचे सांगून पोलिसांचे बळ आणि सत्तेच्या जीवावर वैभव नाईक यांनी केलेला स्टंट बाळासाहेबांच्या शिवसेनेला काळिमा फासणारा असल्याचे दत्ता सामंत म्हणाले. एवढे करून आम. नाईक थांबले नाही तर माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांना आखाड्यात येण्याची भाषा ते करत आहेत. आम. नाईक यांच्या स्वार्थी व अरेरावी वृत्तीचे उत्तर त्यांना आगामी काळात नक्की मिळेल. असेही दत्ता सामंत यांनी सांगितले. माझी स्वतःची राजकीय वाटचाल शिवसेनेतून सुरू झाली. हिंदुत्वाचा धागा पकडून आम्ही शिवसेनेत गेलो. त्यानंतर राणेसाहेब जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करून शिवसेना पक्ष आम्ही वाढवला. आज कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी स्वतः काही उपक्रम राबवत असून माझे राजकीय गुरू असलेल्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनीदेखील फोन आपले कौतुक केले, ही पोचपावती माझ्यासाठी मोठी आहे. माझे काम मी सुरूच ठेवणार आहे, असेही दत्ता सामंत यांनी सांगितले. कोरोना काळात काही शिवसैनिक, पदाधिकारी मृत्युमुखी पडले. त्यांना मदत करणे सोडाच या कुटुंबाची साधी विचारपूस आम. वैभव नाईक यांनी केली नाही. कोरोना नसताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या घरी जाऊन वैभव नाईक फोटो काढायचे. आता तर कोरोनाकाळात तरुण, वृद्ध मृत्युमुखी पडले. मात्र कोणाची साधी चौकशीही आमदार करत नाहीत. त्यामुळे स्वार्थी राजकारणातील त्यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे हे सिद्ध झाले आहे, अशी टीकाही दत्ता सामंत यांनी केली.
