मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी:मधुमक्षिका पालनापासून सौरऊर्जेपर्यंत; विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी..
⚡कुडाळ ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून अविरत मेहनत घेत आहेत. मधुमक्षिका पालन उपक्रमासाठी सिंधुदुर्ग हा पूर्ण देशातील हॉटस्पॉट आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालन अर्थात मधुर क्रांती उपक्रमातून जिल्ह्यातील युवकांना यात करियर करण्यासाठी चांगली संधी आहे, असा विश्वास महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केला. येथील संत राऊळ महाराज महाविद्यलयात आज करियर कट्टाच्या एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. शितोळे बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हाभरातील महाविद्यालयांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेपासून करियर कट्टाच्या राज्यस्तरीय कार्यशाळा उपक्रमाचा शुभारंभ झाला. यांनतर संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात हि कार्यशाळा होणार आहे.
विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हास्तरीय ‘करिअर कट्टा’ एकदिवसीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आले होते. राज्यातल्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत, त्याचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून झाला आहे.
प्रा. डॉ. स्मिता सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जल अर्पण करून झाला. यावेळी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आणि मार्गदर्शक तुळशीदास गावडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक आणि मार्गदर्शक भूषण कोळेकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यक केंद्रचे अध्यक्ष यशवंत शितोळे, करियर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अजित दिघे, महाविद्यालयीन समन्वयक प्रा. अजित कानशिडे आणि प्रा. उमेश कामत, करियर संसद मुख्यमंत्री अनुष्का परब, प्राचार्य समीर तारी आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेविषयी बोलताना यशवंत शितोळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या करियर कट्टाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केलं. आणि विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. त्याच बरोबर मधमाशी पालनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हा हॉटस्पॉट असल्याने करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याकडे वळवीवण्यासाठी राज्यातल्या १०० महाविद्यालयात हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचाही शुभारंभ आज करण्यात आला. सौर ऊर्जा, सोशल मीडिया प्रोफाइल मॅनेजर आणि भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यासाठीच स्टार्टअप विद्यार्थ्यांनी उभारावा यासाठी देखील प्रयत्न होत असल्याचे यशवंत शितोळे यांनी सांगितले. आजकाल पेपरफुटीच्या घटना घडतात त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्य येते. काही विद्यार्थी आपले जीवन संपवतात या विषयी बोलताना श्री. शितोळे म्हणाले, कि यासाठी स्पर्धा परीक्षांतील अपयश हे काही अंतिम अपयश नसते हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. करियरच्या इतर पर्यायाकडे विद्यार्थ्यांना वळविण्याचा प्रयत्न करियर कट्टा करत आहे असे श्री. शितोळे म्हणाले. करियर कट्टाचे विद्यार्थी भावना व्यवस्थापन शिकतात. त्यासाठी इक्यू क्लबची स्थापन महाविद्यालयातून करण्यात आलेली असल्याचे श्री. शितोळे यांनी सांगितले.
यशवंत शितोळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे मार्गदर्शन केल. तसंच भूषण कोळेकर यांनी सुद्धा बँकिंग बाबत मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तुळशीदास गावडे यांनी मधुर उपक्रमाबद्दल माहिती देताना मधुमक्षिका पालन बाबत मार्गदर्शन केलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी करियर कट्टा हि संकल्पना स्पष्ट करून सांगताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून काम करण्याचे आवाहन केले. आपल्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे ते निश्चित करा आणि तेच करियर म्हणून निवडा असे आवाहन डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. या कार्यशाळेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. अजित दिघे यांनी तर पाहुण्यांची ओळख प्रा. अजित कानशिडे यांनी करून दिली. कार्यक्रमाच सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा सावंत यांनी केलं. या कार्यशाळेला जिल्हाभरातून विविध कॉलेजचे प्राचार्य, समन्वयक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
