Headlines

वैभव नाईकांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…

आम. निलेश राणेंचा महारथ वैभव नाईक रोखू शकत नाहीत:दत्ता सामंत यांचे जोरदार प्रत्युत्तर..

⚡मालवण ता.२१-:
“गद्दारीचा कलंक लागेल म्हणून शिंदे शिवसेनेत गेलो नाही” असे सांगणारे माजी आमदार वैभव नाईक हे स्वतःच शिंदे गटात येण्यास उतावीळ होते, वैभव नाईक यांनी काँग्रेस मधून शिवसेनेत येऊन यापूर्वीच गद्दारी केलेली आहे. त्यामुळे नाईक यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. दहा वर्षे आमदारकी उपभोगून देखील नाईक कुडाळ मालवण मतदार संघात विकासकामे करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आमदार निलेश राणे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, आम. राणे यांनी विधिमंडळात मतदार संघातील प्रश्न मांडतानाच गेल्या दीड वर्षात मालवण कुडाळच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणला आहे, त्यामुळे आम. राणे यांचा महारथ वैभव नाईक किंवा कोणीही रोखू शकत नाही, असे जोरदार प्रत्युत्तर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वैभव नाईक यांना पत्रकार परिषदेतून दिले.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी सामंत यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी वैभव नाईक यांच्या दाव्यांचे खंडन करत जोरदार टीका केली. सामंत म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिवसेनेतून मदतीची अन् उमेदवारीची विचारणा केली होती. मात्र, मी निलेश राणेंना शब्द दिला असल्याने निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यावेळी वैभव नाईक स्वतः शिंदे गटात येण्यास उतावीळ झाले होते. परंतु, तिथे निलेश राणेंशिवाय पर्याय नाही आणि आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पळ काढला. आता ते गद्दारीचा कलंक पुसण्याचे नाटक करत खोटारडेपणा करत आहेत. कारण नाईक कुटुंबाचा डीएनए काँग्रेसचाच आहे. वैभव नाईकांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, वैभव स्वतः युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या वडिलांना काँग्रेसने विधानसभेचे तिकीट देऊनही ते पराभूत झाले. काँग्रेसने सर्वकाही देऊनही सत्ता सोडून नाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता ते निष्ठेच्या आव आणत आहेत, हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे, अशी टीका सामंत यांनी केली.

वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार होते. मात्र नाईक यांच्याकडे जरा तरी बुद्धी अन् कर्तृत्व असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रीपद मिळाले असते. परंतु ठाकरेंनाही त्यांची क्षमता उत्तम ठाऊक होती. विधिमंडळात एकही ठोस प्रश्न न मांडता, १० वर्षे फक्त पर्ससीन अन् पारंपारिक मच्छीमारांमध्ये वाद लावून स्वतःची टक्केवारी साधली. मामा वरेरकर नाट्यगृह, भुयारी गटार योजना आणि मालवणची ४६ कोटींची पाणी योजना १० वर्षे धुळखात ठेवून जनतेची दिशाभूल केली, असे आरोप सामंत यांनी करत नाईकांनी निलेश राणेंवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या १० वर्षांच्या अपयशाचे उत्तर द्यावे. त्यांच्या पोटात उठलेल्या शुळावर त्यांनी त्वरित ‘अॅन्टासिडची बाटली’ प्यावी, असा टोला लगावला.

नुकत्याच झालेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीत एकही विद्यमान नगरसेवक सोबत नसताना आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत ११ पैकी १० जागांवर विजय मिळवून जनतेने निलेश राणेंवर विश्वास दाखवला आहे. नाईकांचा एकच उमेदवार कसाबसा नाका-तोंडात पाणी जाऊन निवडून आला आहे, अशी टिकाही सामंत यांनी केली.

यावेळी दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांनी अवघ्या दीड वर्षात मतदारसंघात आणलेल्या निधीची यादीच वाचून दाखवत कुडाळ-मालवणच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणल्याचे सांगितले. शासकीय निधीव्यतिरिक्त आमदार निलेश राणे यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल १५ ते २० कोटी रुपये खर्चुन सामान्य जनतेच्या समस्या सोडवल्या आहेत असे सामंत यांनी सांगत आम. राणे यांचा हा विकासाचा महारथ वैभव नाईक रोखू शकत नाहीत. या कामांमधून आम. निलेश राणे यांनी जनतेचा विश्वास सार्थकी ठरवला असून २०२९ च्या विधानसभेत जनता निलेश राणेंना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देईल, आणि तसे झाले नाही तर मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हान दत्ता सामंत यांनी दिले.

You cannot copy content of this page