Headlines

आचरा गाऊडवाडी शाळेतील पदवीधर शिक्षिकेची नियुक्ती तात्काळ मूळ शाळेत करा…

ग्रामस्थ व पालकांची मालवण पंचायत समितीकडे मागणी…

मालवण, दि प्रतिनिधी

आचरा गाऊडवाडी येथील पूर्ण प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिकेची अन्य शाळेत कामगिरीवर करण्यात आलेली नियुक्ती रद्द करून त्यांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करावे, अशी आक्रमक मागणी आचरा येथील लोकप्रतिनिधी, पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे. शिक्षिका नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे उपसभापती घनश्याम झाड यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहितीसह निवेदन सादर केले.

‘ग्राम विकास मंडळ आचरे-गाऊडवाडी पंचक्रोशी, मुंबई’ यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, या पूर्ण प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीचे वर्ग कार्यरत आहेत. पूर्वी येथे दोन उपशिक्षक व एक पदवीधर शिक्षक कार्यरत होते. गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवीचा वर्ग नसल्याचे कारण दाखवत येथील पदवीधर शिक्षिकेला अन्य शाळेत कामगिरीवर पाठवण्यात आले होते. सध्याच्या नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता ६ वी आणि ७ वीचे वर्ग पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. तरीही या पदवीधर शिक्षिकेला अद्याप मूळ शाळेत परत पाठवण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर उपसभापती घनश्याम झाड यांनी तात्काळ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या समस्येबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. “कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सभापती, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित पालकांना दिली.
यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, जाकारिएस फर्नांडिस, चंदन पांगे, जयंत पांगे, सुनील पेडणेकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page