मळगाव घाटीतील ब्रिटिशकालीन मोरी कोसळली प्रांताधिकारी खांडेकर यानी दिली भेट

सावंतवाडी रेडी मार्गावरील मळगाव घाटीतील ब्रिटिश कालीन मोरी गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली आहे. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आज शनिवारी सायंकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटी, शाखा अभियंता सुरेश पाटील यांनी त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली. या संपूर्ण मोरीचे नवीन बांधकाम न केल्यास पूर्ण रस्ता खचून मोठा अपघात होण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन बांधकाम करण्यासाठी रस्ता किमान आठ दिवस बंद ठेवावा लागेल असेही त्यांनी सुचवले. यावर सोमवारी याबाबत निर्णय घेऊन आदेश काढण्यात येईल असे संकेत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत. यावेळी उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब तसेच पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी ऐन पावसाळ्यात सुरु केलेल्या या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्ता बंद करायचा असल्यास दशक्रोशीतील सरपंचांना विश्वासात घ्यावे लागेल व पर्यायी मार्गाची व्यवस्थाही करावी लागेल अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र, अपघात होऊन रस्ता पूर्णपणे बंद होण्यापेक्षा रस्ता आठ दिवस बंद करून रात्रंदिवस काम करून कायमस्वरूपी रस्ता व्यवस्थित करूया त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उप अभियंता अनिल आवटी यांनी उपस्थितांना केले. सोमवारी याबाबत प्रांताधिकारी आदेश काढणार असून त्यानंतर सदरचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी आवटी यांनी दिली. खरंतर मोरी कोसळेपर्यंत प्रशासनाने वाट बघणे हेच मुळी चुकीचे आहे. प्रशासनाकडून नेहमीच निधी नसल्याचे रडगाणे गायले जाते. मग अत्यावश्यक बाब म्हणून ऐन पावसाळ्यात सुरू असलेले बांधकाम कोसळले याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी राजू परब व बाबू सावंत यांनी उपस्थित केला. भविष्यातील मोठा अपघात टाळण्यासाठी हे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे असून काम सुरू असताना वरिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्षात उभे राहून व्यवस्थित काम करून घ्यावे अशी मागणीही यावेळी राजू परब यांनी केली. तसेच या रस्त्याला पर्यायी असलेले आकेरी व इन्सुली हे दोन्ही रस्ते स्थानिकांसाठी मोठा वळसा असल्याने ठेकेदारानेही दिवस रात्र काम करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व रस्ता वाहतुकीस उपलब्ध करून द्यावा असेही त्यांनी यावेळी सुचवले. यावेळी मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाटेकर, प्रसाद नाईक, ठेकेदार अमेय आरोंदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page